Latest News

Latest News
Loading...

राजूर कॉलरीत किराणा दुकान फोडून २४ हजारांचा ऐवज लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली असून बंद दुकाने व घरांना लक्ष्य करून चोरटे आपला चोरीचा डाव साधू लागले आहेत. राजूर कॉलरी येथील एका किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीचे नाणे असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मुक्तार सिंह (६८) हे डब्ल्यूसीएलमधून निवृत्त झाले असून राजूर कॉलरी येथे आपल्या भावासोबत किराणा दुकान चालवितात. बुधवारी (२९ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले होते. गुरुवारी पहाटे ते फिरण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले आणि लोखंडी शटर उचकटलेले दिसले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता गल्ल्यातील २१ हजार रुपये रोख, चांदीची पाच नाणी (अंदाजे ३ हजार रुपये) तसेच दोन चॉकलेटचे बॉक्स असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

दुकानात चोरी झाल्याची खात्री पटताच सुरेश सिंह यांनी वणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या ताकरीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसएसच्या कलम ३०५(a),३३४(१) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांमध्ये वाढली असुरक्षिततेची भावना

अलीकडच्या काळात बंद घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढू लागल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, संशयितांवर करडी नजर ठेवणे आणि चोरीच्या घटनांचा छडा लावून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.

या घटनेमुळे राजूर कॉलरी परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.