संततधार पावसाने वणी जलमय; नदी-नाले दुथडी भरून वाहिले, घरांमध्ये पाणी शिरल्याने मजूर कुटुंबांचे मोठे नुकसान
वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल भाग जलमय झाले असून काही वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी थेट घरात घुसल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहतांना दिसत आहेत. तर पुलावरून पुराचे वाहू लागल्याने कायर-पठारपूर मार्गही काही काळ बंद पडल्याचे पाहायला मिळले. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांची दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
पट्टाचारा नगरातील मजूर वस्तीवर संकट
३० जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे स्टेशन रोडलगतच्या पट्टाचारा नगर या मजूर वस्तीला बसला. नाल्याचे पाणी अचानक वस्तीत शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी, गाद्या, आणि इतर जीवनावश्यक साहित्य पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसमोर आता उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
याच परिसरातील मजूर महिला मुन्नीबाई कटोते यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य व आवश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली. रोजंदारीवर संसार चालविणाऱ्या या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः उघड्यावर आणल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
नाल्याचा प्रवाह अडल्याने वाढली समस्या
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील पाणी वाहून नेणारा मुख्य नाला पट्टाचारा नगर परिसरातून पुढे गुंज नाल्यात मिळतो. मात्र वणी–वरोरा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच नाल्यालगत असलेल्या एका प्लॉटधारकाने हा नाला आणखीच विस्तीर्ण केला. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाची गती मंदावली. हा नाला कुठे उंच तर कुठे सखल झाल्याने या नाल्याचं मूळ स्वरूपच बदललं आहे. तसेच या नाल्यावर करण्यात आलेल्या काही बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह अधिकच संथ झाला. परिणामी मुसळधार पावसात नाल्याचे पाणी उलटून थेट नागरिकांच्या घरात शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कायर-पठारपूर मार्ग काही काळ बंद
तालुक्यातील कायर–पठारपूर मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने काही काळ हा मार्ग बंद पडला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आणि नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीही बाहेर पडणे कठीण झाले. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने पुलाची उंची वाढविणे किंवा पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे.
तीन मंडळांत अतिवृष्टीची नोंद; प्रशासन सज्ज
तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असून तीन महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत, अन्नधान्य व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था आणि पूल-नाल्यांवरील कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
प्रत्येक वर्षी त्याच त्या भागात पाणी साचणे, घरांमध्ये पाणी घुसणे आणि ग्रामीण भागातील संपर्क तुटणे या घटना घडत असल्याने तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे.
स्थानिकांच्या मते, नाल्यांचे रुंदीकरण, अतिक्रमणे हटविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे आणि पूरग्रस्त भागांसाठी स्वतंत्र आराखडा तयार केल्यास भविष्यात अशा संकटांची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहरातील अपुऱ्या नागरी सुविधांचे वास्तव समोर आणले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


No comments: