मागील वर्षीच्या कापूस वेचणीची थकीत मजुरी मागितल्याचा रागातून एका मजुर महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे घडली. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला आकाश भगत (वय २७, रा. राजूर कॉलरी) या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची निखिल संजय लेडांगे (२७) रा. भांदेवाडा ता. वणी याच्याकडे मागील वर्षीची कापूस वेचणीची मजुरी बाकी असल्याने निर्मला या निखिलला वारंवार फोन करून मजुरीच्या पैशाची मागणी करत होत्या.
दरम्यान, २६ जुलैला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथील प्राथमिक शाळेजवळ निर्मला यांची निखिलशी भेट झाली. यावेळी त्यांनी थकीत मजुरीची रक्कम देण्याची मागणी केली असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि निखिलने महिलेच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला.
थकबाकी मजुरीच्या पैशावरून निखिलने मारहाण केल्यानंतर निर्मला या जखमी अवस्थेत घरी परतल्या. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरूच होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीसह वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी निखिलवर बीएनएसच्या कलम ११७(२), ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
थकीत मजुरीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे मजूर वर्गाच्या सुरक्षिततेचा आणि वेळेवर मजुरी न मिळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments: