Latest News

Latest News
Loading...

उमरघाटच्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संजय खाडे आक्रमक; उर्वरित जमिनींचे एकत्रित अधिग्रहण करण्याचा वेकोलिला अल्टिमेटम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मौजा उमरघाट (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथील अनेक वर्षांपासून अधिग्रहणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस नेते संजय खाडे यांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना सोबत घेऊन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) वणी नॉर्थ एरियाचे मुख्य महाप्रबंधक यांची भालर येथे भेट घेतली, आणि जमीन अधिग्रहणासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करून उर्वरित शेतकऱ्यांच्या जमिनींचे तात्काळ अधिग्रहण करण्याची ठाम मागणी केली.

यावेळी उमरघाट येथील उर्वरित सर्व शेतीजमिनींचा बोर्डा भूमिगत (UG) अथवा घोन्सा ओपनकास्ट (OC) खाण प्रकल्पामध्ये समावेश करून त्यांचे एकत्रित अधिग्रहण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अधिग्रहण प्रक्रियेमुळे प्रभावित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ तातडीने देण्यात यावेत, अशीही आग्रही भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

संजय खाडे यांनी निवेदनात नमूद केले की, अनेक वर्षांपासून अधिग्रहणाबाबत अनिश्चितता कायम असल्याने शेती, गुंतवणूक आणि भविष्यातील नियोजनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाचे संयुक्त सर्वेक्षण करून अधिग्रहणाबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर मांडून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

यावेळी शंकर वऱ्हाटे, अशोक धोबे, गजानन सरवर, सुभाष जूनधरे, शैलेश खामनकर, गजानन उपरे, संस्कार मोहुर्ले, दिनेश जयस्वाल, संजू आत्राम, गौरव उरकुडे, संदीप चिडे, शंकर बटशेट्टीवार, नितीन गंधेवार, आकाश गज्जलवार, रक्षक नगराळे, उज्वल गंधेवार, संजय गंधेवार, संतोष मोहुर्ले, सतीश बोढे, गजानन झाडे, भीमराव वाधाडे, मेघश्याम उपरे, स्वप्नाली उपरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.