प्रशांत चंदनखेडे वणी :-
शेतातील विद्युत डीपीवरील उच्चदाब वाहिनीचे काम करताना विजेचा तीव्र धक्का लागून कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ ऑगस्ट) दुपारी चार ते साडेचार वाजताच्या सुमारास चारगाव–वारगाव मार्गावर घडली. विनोद कुळसंगे (वय अंदाजे ३५ ते ४०, रा. निंबाळा, ता. वणी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विनोद कुळसंगे हे मूळचे घाटंजी तालुक्यातील रहिवाशी असून मागील १२ वर्षांपासून ते निंबाळा येथे कुटुंबासह राहत होते. ते महावितरणच्या शिरपूर विभागात कंत्राटी लाईनमन म्हणून कार्यरत होते. बुधवारी चारगाव–वारगाव मार्गावरील एका शेतातील डीपीवरील उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम सुरू असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्याला एवढ्या जोखमीच्या कामासाठी एकट्यालाच पाठविण्यात आले होते का? कामाची पूर्वकल्पना संबंधित स्थायी कर्मचाऱ्यांना होती का? तसेच सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे घटनास्थळी पोहोचले. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
मृत विनोद कुळसंगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

No comments: