प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील पारडी (गोवारी) येथून दहावीत शिक्षण घेणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, घरून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (वय १५ वर्षे १९ दिवस) ही कोरपणा येथील एका महाविद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून ती दररोज पारडी येथून एसटी बसने ये-जा करत होती.
तक्रारीनुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी तिचे आई-वडील मजुरीसाठी शेतात गेले, तेंव्हा ही मुलगी आणि तिची धाकटी बहीण या दोघीही बहिणी घरीच होत्या. सायंकाळी सुमारे सहा वाजता आई-वडील घरी परतले असता त्यांना मोठी मुलगी घरात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत धाकट्या मुलीकडे विचारणा केली असता तिनेही मला माहिती नसल्याचे उत्तर दिले.
यानंतर कुटुंबीयांनी घर, शेजार, नातेवाईक तसेच गाव परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने अखेर शिरपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वडिलांच्या तक्रारीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बसस्थानके तसेच संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यात येत असून, नागरिकांना संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने शिरपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: