Latest News

Latest News
Loading...

मार्गात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली; अपघातात तरुणाचा हात तुटला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात पूर्णपणे तुटला आहे. ही घटना १३ ऑगस्टला रात्री ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील गौराळा फाट्याजवळ घडली. अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शुभम रविंद्र ठावरी (२१) रा. आष्टी ता. वरोरा जि. चंद्रपूर असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, शुभम हा बजाज फायनान्स कंपनीत कार्यरत असून तो काही कामानिमित्त मारेगावला गेला होता. तेथील काम आटपून तो दुचाकीने वणीकडे येत असतांना गौराळा फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर त्याची दुचाकी आदळली. धडक एवढी जोरदार होती की त्याचा एक हात अक्षरशः तुटून (शरीरापासून वेगळा झाला) पडला. दुचाकी ट्रकवर आदळल्याचे लक्षात येताच आसपासच्या व मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. शुभमवर रुग्णालयीन उपचार सुरु असले तरी अपघातात त्याला एक हात गमवावा लागला. त्यामुळे कुटुंबातील कर्त्या तरुणावर कायमचं अपंगत्व ओढवलं गेलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहे. 

वणी-मारेगाव हा प्रमुख रहदारीचा मार्ग असून हा मार्ग नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळते. दिवसरात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. त्यातच या मार्गावर कोलडेपो, कोळसा स्टॉकयार्ड, कोळशाचे प्लॉट, स्पेअरपार्ट्स विक्रीची दुकाने, वाहने दुरुतीचे गॅरेज, ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये, त्यांचे कॅम्प, वेल्डिंगची दुकाने आणि गौराळा फाट्याजवळ असलेली लाइमस्टोनची खदान, या ठिकाणी नेहमी रस्त्यांवर वाहने उभी असलेली पाहायला मिळतात. या ठिकाणांवर तासंतास रस्त्यावर उभी असलेली वाहने अपघाताला कारणीभूत ठरू लागली आहेत. रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात घडले असून या अपघातात कित्येक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. तर अनेकांना अपंगत्व आलं आहे.

याठिकाणी रात्रीच्या वेळेलाही बेजबाबदारपणे रस्त्यावर वाहने उभी केली जातात. रस्त्यावर उभे केलेले वाहन इतर वाहनधारकांच्या दृष्टीस पडेल, अशी कुठलीही खबरदारी चालकांकडून घेतली जात नाही. परिणामी अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने उभ्या वाहनांवर इतर वाहने आदळून भीषण अपघात घडत आहेत. तेंव्हा वाहनचालकांना शिस्त लावणे आता गरजेचे झाले आहे. त्याकरिता रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच बेजबाबदार चालकांवरही कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. आणि तशी मागणीही आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.