प्रशांत चंदनखेडे वणी :-
देशभक्तीची उर्मी, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी वणी शहर दुमदुमून गेले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्त नागरिकांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला तब्बल २,५०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांचे झेंडे व बॅनर बाजूला ठेवून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे ही रॅली वणीच्या सार्वजनिक जीवनातील एक लक्षवेधी आणि ऐतिहासिक उपक्रम ठरली.
विश्रामगृह येथून सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या रॅलीत शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त सैनिक, बचत गटांच्या महिला, सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा घेतलेल्या नागरिकांमुळे शहरातील प्रमुख रस्ते अक्षरशः तिरंगामय झाले होते. देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टिळक चौक असा प्रवास केला. विशेषतः युवकांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग या रॅलीचे ठळक वैशिष्ट्य ठरले. राष्ट्रप्रेमाचा संदेश देत तरुणाईने तिरंग्याप्रती आपला अभिमान व्यक्त केला.
रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संस्था, जैन समाजाची श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी तसेच व्यापारी बांधवांनी सहभागी नागरिकांसाठी पाणी व बिस्कीटचे वाटप केले. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत केले.
या रॅलीचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध नियोजन आणि स्वच्छतेची जपलेली काळजी. रॅली पुढे सरकत असताना नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी मागोमाग संपूर्ण मार्गाची स्वच्छता करीत होते. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊनही शहरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, याची आयोजकांनी विशेष दक्षता घेतली.
वणी पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत ठेवली. पोलिसांनीही या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभाग नोंदविला. प्रशासन, पोलीस, नगरपरिषद आणि नागरिक यांच्या समन्वयामुळे रॅली नियोजित पद्धतीने पार पडली.
राजकीय भेद विसरून राष्ट्रध्वजासाठी एकत्र येणे हे या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही पक्षीय झेंडे बाजूला ठेवून तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले. त्यामुळे ‘राष्ट्र प्रथम’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून वणीकरांनी दिला.
रॅलीच्या समारोपानंतर आयोजकांच्या वतीने विश्रामगृह येथे सहभागी नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आयोजकांनी विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक-सांस्कृतिक व धार्मिक संघटना, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक, प्रशासन, पोलीस व वाहतूक पोलीस, पत्रकार आणि सर्व वणीकरांचे आभार मानले.
‘तिरंगा आहे अभिमान, ठेवू त्याचा सदैव मान’ या भावनेने आयोजित या रॅलीने वणी शहरात देशभक्तीची लहर निर्माण केली. हजारो नागरिकांचा एकत्रित सहभाग पाहता, वणीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या तिरंगा रॅलीपैकी एक म्हणून या उपक्रमाची नोंद झाली.

No comments: