Latest News

Latest News
Loading...

संत नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न


प्रशांत चंदनखेडे वणी :-

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, वणी तसेच वणी-मारेगाव-झरी परिसरातील समाजबांधवांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. घटस्थापना, महिला भजन, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर उज्ज्वलकर होते. प्रमुख मार्गदर्शक उदयपाल महाराज, प्रमुख पाहुणे सुरेश किटे यांच्यासह डॉ. प्रशांत घाटोळे, अनिल जुमडे, विजया दहेकर, सुरज बोन्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. संत नामदेव महाराजांनी दिलेला भक्ती, सामाजिक एकोपा, शिक्षण आणि प्रबोधनाचा विचार आजही समाजासाठी दिशादर्शक असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुरेश चांगले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रगती साधून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यानंतर हिंगणघाट येथील ह.भ.प. प्रवीण महाराज काटकर व संच यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. आयोजक अभय जुमडे यांच्यासह मान्यवरांनी कीर्तनकार महाराजांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संत नामदेव महाराजांचे जीवनकार्य, संतविचार, सामाजिक एकोपा आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी जागर कीर्तनातून करण्यात आला. भक्तीबरोबरच शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीचा संदेश देणाऱ्या या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या विश्वस्त कार्यकारिणीसह आयोजन समिती व महिला समितीने विशेष परिश्रम घेतले. वणी, मारेगाव, झरी-जामणी तसेच परिसरातील शिंपी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील देऊळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजेंद्र पालकर यांनी केले. समारोपानंतर उपस्थित भाविक व समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर करीत सामाजिक एकता, शिक्षण, संघटन आणि प्रबोधनाचा संकल्प घेऊन संजीवनी समाधी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

No comments:

Powered by Blogger.