Latest News

Latest News
Loading...

१६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आई आजारी असल्याने आईसोबत तिच्या माहेरी आलेली १६ वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्याने मारेगावातील वार्ड क्रमांक ८ मध्ये खळबळ उडाली आहे. मुलगी मैत्रिणींकडेही गेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या आईने मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी बीएनएसएसच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक १६ येथील ३६ वर्षीय महिला मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे आपला मुलगा व १६ वर्षीय मुलीसह वार्ड क्रमांक ८ येथील आईच्या घरी राहत होती. संबंधित मुलगी स्थानिक कला वाणिज्य विद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे.

११ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता आईची प्रकृती बरी नसल्याने ती घरात झोपली होती. काही वेळाने उठल्यानंतर मुलगी घरात दिसून आली नाही. याबाबत आजीला विचारणा केली असता, मुलगी काही वेळापूर्वी घरातच होती, मात्र ती कुठे गेली याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

दुपारपर्यंत मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला. मात्र संबंधित मैत्रिणींनीही ती त्यांच्या घरी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक तसेच परिसरात शोध घेण्यात आला; मात्र मुलीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

अखेर मुलीच्या आईने आपल्या भावासोबत मारेगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार व शाळेच्या बोनाफाईडच्या आधारे गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल जुनेद शेख करीत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन मुली घरातून अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता वाढत आहे. शिक्षणाच्या वयात मुलींवर विविध माध्यमांतून होणारा प्रभाव, अनोळखी व्यक्तींशी वाढणारा संपर्क आणि भावनिक गुंतवणुकीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता पाहता पालकांनी मुलांच्या हालचालींकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र अशा घटनांमध्ये मुलींना दोष देण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक, शाळा आणि पोलीस यंत्रणेने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

No comments:

Powered by Blogger.