उकणी गावालगतच्या उर्वरित सुमारे ६०० हेक्टर जमिनीचे संपादन, प्रकल्पग्रस्तांना रोजगार आणि गावाच्या पुनर्वसनाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. WCL चे CMD डॉ. हेमंत पांडे यांनी उकणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना जमीन संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पुढे नेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उकणीतील शेतकरी व ग्रामस्थांच्या अपेक्षांना नवी उभारी मिळाली आहे.
उकणी गावालगतच्या जमिनीच्या संपादनासह प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर CMD डॉ. हेमंत पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया, उकणी गावाचे पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याच्या मागणीवरही CMD यांनी सकारात्मक भूमिका घेतली. गावाचे योग्य ठिकाणी तातडीने पुनर्वसन, प्रलंबित जमीन संपादन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
दरम्यान, उकणीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न WCL प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी HMS युनियनचे WCL अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतूनच CMD यांचा उकणी दौरा घडून आल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यामुळे उकणीच्या प्रलंबित प्रश्नांना आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी HMS युनियनचे सचिव शरद धांडे, सेफ्टी बोर्ड मेंबर संजय खाडे, यादव, दीपक जयस्वाल, प्रदीप जेऊरकर यांच्यासह उकणीतील शेतकरी, शेतकरी संघर्ष समिती, उकणी गाव पुनर्वसन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
CMD यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे उकणी येथील जमीन संपादन, पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न आता केवळ आश्वासनांपुरते न राहता या प्रश्नांना प्रत्यक्ष कार्यवाहीचे स्वरूप मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रश्नांना घेऊन काँग्रेस नेते संजय खाडे यांनी वेळोवेळी आवाज उठविला होता, आणि सतत ते जमीन संपादनाचा विषय वेकोलिकडे मांडत होते. त्यांच्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होतांना दिसल्या.


No comments: