Latest News

Latest News
Loading...

साळीचा मोबाईल नंबर मागितल्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात लाकडी टेंप्याने वार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

साळीचा मोबाईल नंबर मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. एका तरुणाच्या डोक्यात लाकडी टेंप्याने दोन-तीन वेळा वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गणेशपूर परिसरात घडली. याप्रकरणी रितिक गणेश पिदुरकर (वय २४, रा. गणेशपूर, वणी) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंकज लाकडे (वय २८, रा. रंगारीपुरा, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, रितिक पिदुरकर याची ईश्वर लिंगे याच्याशी मैत्री आहे. ईश्वरचा मित्र असलेल्या पंकज लाकडे याला तो ओळखतो. पंकजची सासू व साळी रितिकच्या घराजवळ भाड्याने राहत असल्याने पंकजचे त्या परिसरात नेहमी येणे-जाणे होते.

दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास रितिक हा गणेशपूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असताना पंकज पत्नीसमवेत तेथे आला. पंकजने रितिकला तू ईश्वर लिंगेकडे माझ्या साळीचा मोबाईल क्रमांक का मागितला, अशी विचारणा केली. मात्र रितिकने आपण मोबाईल क्रमांक मागितला नसल्याचे सांगत ईश्वरला बोलावून त्याच्याकडूनच खात्री करून घेण्यास सांगितले.

यानंतर ईश्वरला तेथे बोलावण्यात आले. यासंदर्भात ईश्वरकडे विचारणा करण्यात आल्यानंतर त्याने रितिकने  मोबाईल क्रमांक मागितल्याचे सांगताच पंकजने रितिकच्या गालावर चापट मारली. त्यानंतर वाद वाढतच गेला. या वादादरम्यान पंकजने हातातील लाकडी टेंप्याने रितिकच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा जोरदार वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात रितिकच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला आणि तो रस्त्यावर कोसळला.

घटनेनंतर पंकजची पत्नी त्याला घेऊन तेथून निघून गेली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रितिकचा भाऊ पीयूष याने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रितिकला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर रितिकने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंकज लाकडे याच्याविरुद्ध बीएनएसएसच्या कलम ११८(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.