प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील सेवानगर परिसरातील १६ वर्षीय विद्यार्थिनी कॉलेज व त्यानंतर ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वणी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. दुपारी सुमारे ३ वाजता कॉलेजमधून घरी परतल्यानंतर कपडे बदलून ट्युशनला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी तिची वाट पाहिल्यानंतर नातेवाईक, मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीत विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास करण्यात येत आहे.

No comments: