लाईट बिलाच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना वणी शहरातील सर्वोदय चौक परिसरात घडली. दारूच्या नशेत असलेल्या बहिणलेकाने घरातील सामानाची फेकाफेक करीत मावशीला शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केल्याची तक्रार वणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाला असून डाव्या पायालाही दुखापत झाली आहे.
सुनिता वारलु एमपल्लीवार (वय ५१) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा बहिणलेक राहुल मोरेश्वर पालेवार (वय ३२) व त्याची आई मागील काही वर्षांपासून सुनिता यांच्या घरी राहत आहेत. राहुलला दारूचे व्यसन असून दारूच्या नशेत तो नेहमी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी १० वाजता सुनिता, त्यांची बहीण ललिता आणि राहुल घरात उपस्थित होते. यावेळी सुनिता यांनी ललिता यांना लाईट बिलाचे पैसे का देत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी राहुलने घरातील सामान फेकण्यास सुरुवात केली. सुनिता यांनी त्याला सामानाची नासधूस करण्याबाबत जाब विचारला असता त्याने वाद घालत शिवीगाळ केली. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी ललिता मध्ये पडल्या असता राहुलने त्यांनाही ढकलाढकली केली.
यानंतर राहुलने त्याच्या जवळ असलेल्या लाकडी काठीने सुनिता यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला व डाव्या पायाला मार लागला. डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाल्याने शेजाऱ्यांनी मध्यस्थी करीत त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सुनिता यांनी वणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
त्यांची तक्रार व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे वणी पोलिसांनी राहुल पालेवार याच्यावर बीएनएसएसच्या कलम ११८(१) ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments: