प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव तालुक्यातील केगाव (वे) येथील विद्यार्थ्यांची एसटीअभावी होणारी शैक्षणिक फरफट थांबविण्यासाठी गावातून नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयांच्या वेळेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनातून केली. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
केगाव येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मारेगाव शहरासह परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ये-जा करतात. मात्र गावातून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळेत नियमित एसटी बस उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रवासच अडचणींचा बनला आहे. बसची अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्याचा आर्थिक भार पालकांवर पडत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षणासाठी रोजची धावपळ
शाळा-महाविद्यालयाच्या वेळेत बस उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण होते. परतीच्या प्रवासातही बसची सुविधा नसल्याने त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मनसेने म्हटले आहे.
त्यामुळे केगाव ते मारेगाव मार्गावर विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार नियमित बसफेऱ्या सुरू करून त्यांचे योग्य वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आगार प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला.
निवेदन देतेवेळी प्रवीण कळस्कर, धीरज पेचे, प्रफुल गाडगे, धीरज भगवा, सुनील टोंगे यांच्यासह कलावती टोंगे, उमा पिंपळकर, पूजा ठावरी, दिपाली आवारी, सुनिता पानघाटे, नीलिमा पानघाटे, वैशाली मरसकोल्हे, दिशा लडके, गंगु टोंगे, रेणुका वासेकर, वैशाली ठावरी तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
"विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नको"
"विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सुरक्षित प्रवासाचा विचार करून केगाव येथे तातडीने नियमित एसटी बससेवा सुरू करावी. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे

No comments: