Latest News

Latest News
Loading...

गळफास घेतलेल्या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, ११ महिन्यांची चिमुकली मायेला पोरकी



प्रशांत चंदनखेडे वणी :-

घरातील स्नानगृहात गळफास घेतलेल्या तरुण विवाहितेचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ११ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेने ६ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर तिला तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे महिलेवर शर्थीचे उपचार सुरु असतांना तिने काल सायंकाळी शेवटचा श्वास घेतला. आंचल अभिजित मांडवकर (२०) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्याने ११ महिन्यांची चिमुकली आईच्या मायेला पोरकी झाली आहे. 

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ येथे पतीसह राहत असलेल्या आंचलने राहत्या घरी स्नानगृहात गळफास घेतला. त्यावेळी महिलेचा पती अभिजित हा घरीच होता. अभिजित हा सलून कारागीर असल्याचे समजते. पत्नी स्नानगृहात गेल्यानंतर बाथरूममध्ये आंघोळ करण्यासारखी कुठलीच हालचाल न जाणवल्याने तथा बराच वेळ होऊनही पत्नी आंघोळ करून बाहेर न आल्याने अभिजीतच्या मनात संशय आला. त्यामुळे त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता समोरील दृश्य पाहून त्याला चांगलाच धक्काच बसला. त्याला आंचल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता बाथरूमचा दरवाजा तोडला आणि आंचलच्या गळ्यातील फास काढून तिला तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र महिलेची प्रकृती बघता तेथील डॉक्टरांनी तिला वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. परंतु महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने वणी येथील डॉक्टरांनीही तिला चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. शेवटी तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

चंद्रपूर येथील रुग्णालयात ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ११ ऑगस्टला सायंकाळी आंचलने शेवटचा श्वास घेतला. जीवन मृत्यूच्या संघर्षात अखेर जीवनाने मृत्यूपुढे हार मानली आणि सांसारिक जीवनाचा डाव अर्ध्यावर मोडला. संसारवेलीवर एक गोंडस फुल उमललेलं असतांना आंचलने सांसारिक जीवनातून घेतलेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. ११ महिन्यांची चिमुकली पाळण्यात झोपलेली असतांना आंचलने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. जीवनात आलेल्या नैराश्येतून तिने हा टोकाचा निर्णय घेतला की, मानसिक तणावातून तिने हे कठोर पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही. एकूणच तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र महिलेच्या आत्महत्या करण्याने चिमुकलीच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. मायेचा गळा घोटून तिने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. आज आंचलचा मृतदेह चंद्रपुरवरून मारेगाव येथे आणल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

No comments:

Powered by Blogger.