संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या स्मरणदिनानिमित्त वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, वणी तसेच वणी-मारेगाव-झरी जामणी परिसरातील शिंपी समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १० ऑगस्ट आणि मंगळवार, दि. ११ ऑगस्ट असे दोन दिवस हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
सोमवारी रात्री घटस्थापना व महिला भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर मंगळवारी सकाळी दीपप्रज्वलन, संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांसह शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. काल्याच्या कीर्तनासह भजनाचा कार्यक्रमही या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ समाज मंडळ, वणीचे कार्याध्यक्ष मोरेश्वर उज्ज्वलकर राहणार असून, कार्यक्रमाला उदयपाल महाराज, वणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश किटे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात मार्डीचे पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, अनिल जुमळे, विजया दहेकर, सुरज बोंडे हे प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदेव सेवा मंडळ, मारेगाव तालुका सेवाधिकारी सुनील देऊळकर हे करतील.
संत नामदेव महाराजांनी भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांच्या स्मरणदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यातून धार्मिक परंपरेसोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेशही दिला जाणार आहे. त्यामुळे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभय जुमडे, अनंता जुमडे, मोहन तुरुंगे, राजीव वटे यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

No comments: