Latest News

Latest News
Loading...

महागाईचा भडका; सर्वसामान्यांच्या संसाराचे गणित बिघडले


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या जगण्याचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. खाद्यतेलापासून डाळी-धान्यांपर्यंत वाढलेल्या दरांनी घरखर्चाचा ताळमेळ बिघडला असून उत्पन्नाची गती कायम असताना खर्चाचा वेग मात्र वाढत चालल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या दरवाढीने गृहिणींच्या स्वयंपाकघरातील महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

काही दिवसांपूर्वी सुमारे ९५ रुपये लिटर असलेले सोयाबीन तेल आता १३० रुपयांपर्यंत तर १५२ रुपये लिटर असलेले मुंगफल्ली तेल आता १९२ रुपयांवर पोहोचल्याने रोजच्या स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. तेलासोबतच गहू, तांदूळ, तूरडाळ, दूध-दही यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने किराणा बाजारातील खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यात गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाची भर पडल्याने कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर अतिरिक्त ताण आला आहे.

महागाईचा वाढता आलेख पाहता महिन्याचे आर्थिक नियोजन करताना सर्वसामान्यांची चांगलीच कसरत होत आहे. उत्पन्नात अपेक्षित वाढ नसताना घरखर्च मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याने महिनाअखेरीस आर्थिक ताळमेळ साधणे कठीण झाले आहे. किराणा बाजारात आवश्यक वस्तूंची खरेदी करतानाच उत्पन्नातील मोठा हिस्सा खर्च होत असल्याने इतर गरजांवर काटकसर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

भाजीची फोडणीही महागली
खाद्यतेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. भाजी, आमटी अथवा अन्य पदार्थ बनविताना तेलाचा वापरही आता विचार करून करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया गृहिणींमधून उमटत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने घरखर्च भागावितांना महिन्याच्या सुरवातीलाच खिसा रिकामा होतो. त्यामुळे महिनाभर घरखर्च भागविणे सर्वसामान्यांना जड जाऊ लागले आहे.

उत्पन्न कमी, खर्च वाढता; कुटुंब चालवायचे कसे?
महागाईची सर्वाधिक झळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना बसत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर वर्गासमोर तर आर्थिक संकट अधिक गंभीर बनले आहे. अल्प उत्पन्नात पोट भरायचे, मुलांचे शिक्षण करायचे की आजारपणासाठी पैसा राखून ठेवायचा, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.

गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या खर्चात वाढ झाल्याने घरगुती अर्थसंकल्पावर आणखी भार पडला आहे. प्रवासाचा खर्च वाढल्याने दैनंदिन ये-जा करण्यापासून नातेवाईकांच्या भेटीपर्यंत अनेक बाबींचा विचार करूनच खर्च करावा लागत आहे. मुलांसाठी नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य किंवा घरातील एखादी आवश्यक वस्तू खरेदी करतानाही आता नागरिकांना आर्थिक गणित मांडावे लागत आहे.

महागाईने बचतीलाही लागली कात्री
दैनंदिन गरजा भागविण्यातच उत्पन्न खर्च होत असल्याने सर्वसामान्यांच्या बचतीवरही परिणाम झाला आहे. पूर्वी महिन्याच्या उत्पन्नातून काही रक्कम भविष्यासाठी बाजूला ठेवली जात होती; मात्र आता वाढत्या खर्चामुळे बचत करणेही अवघड झाले आहे. उपजीविकेच्या वस्तूंपलीकडे अन्य वस्तूंची खरेदी करण्याची क्षमता सर्वसामान्य कुटुंबांची कमी होत चालली आहे.

दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम सामान्यांच्या घरखर्चावर होत असताना महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी हस्तक्षेपाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महागाईचा चटका आता केवळ बाजारपेठेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. वाढत्या खर्चामुळे घरखर्चाचे गणित कोलमडले असून ‘उत्पन्न तेच, पण खर्च वाढला’ अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

No comments:

Powered by Blogger.