Latest News

Latest News
Loading...

वणीत १३ ऑगस्टला देशभक्त नागरिकांची भव्य तिरंगा रॅली


प्रशांत चंदनखेडे वणी :-

देशभक्तीला कोणत्याही पक्षाच्या चौकटीत न बांधता 'आम्ही सर्व भारतीय' ही भावना आणि ‘वणीकर’ हीच ओळख ठेऊन हातात तिरंगा धरण्याचा संकल्प शहरातील नागरिकांनी केला आहे. राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना जनमानसात अधिक दृढ करण्यासाठी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वणीत भव्य ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा झेंडे राहणार नसून केवळ राष्ट्रध्वज हातात घेऊन नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशप्रेमाची भावना जागविणारा हा उपक्रम ठरणार आहे.

वणी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्था तसेच युवक-युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी होणार आहेत. नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच ‘देश प्रथम’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

या रॅलीला विश्रामगृह येथून प्रारंभ होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, गाडगे बाबा चौक, काठेड ऑईल मिल चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

डौलाने फडकणारा तिरंगा, देशभक्तीच्या घोषणा आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग यामुळे वणी शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे.

‘वणीकर’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
देशभक्ती ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या मनात रुजावी, राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट व्हावी आणि तरुण पिढीला राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजावे, या व्यापक उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वणी तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक व सांस्कृतिक संघटना तसेच युवक-युवतींनी कोणतेही राजकीय झेंडे न घेता केवळ तिरंगा हातात घेऊन या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि देशभक्तीचा हा जागर भव्य स्वरूपात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.