Latest News

Latest News
Loading...

शेतकरी, वनजमीनधारक व आशांच्या प्रश्नांसाठी यवतमाळात उद्या ‘जेलभरो’

प्रशांत चंदनखेडे वणी (यवतमाळ) :-

शेतकरी, कामगार, भूमिहीन वनजमीन कसणारे तसेच आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभा देशव्यापी जेलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. सोमवार, १० ऑगस्ट रोजी यवतमाळातील संविधान चौकात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, मयत कर्जदारांच्या वारसांना सुलभ ई-केवायसीच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ द्यावा, मागील वर्षाच्या पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी तसेच यंदाच्या पीक कर्जासाठी पीक कर्जदर पत्रक दुप्पट करावे, या प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात येणार आहेत.

वनजमीन कसणाऱ्यांच्या हक्कांसाठीही आवाज

वर्षानुवर्षे वनजमीन कसणाऱ्या भूमिहीन व अतिक्रमणधारकांना कोणत्याही दोन पुराव्यांच्या आधारे जमिनीचे पट्टे देण्यात यावेत, चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविलेल्या दाव्यांची फेरतपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गैरआदिवासी वनजमीनधारकांसाठी तीन पिढ्यांची अट न लावता ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुरावा ग्राह्य धरून पट्टे देण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.

वन्यप्राण्यांपासून शेती व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर जंगलाला तारेचे कुंपण उभारावे, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.

आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा ऐरणीवर

आशा कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेले मानधन तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागण्याही आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या जाणार आहेत.

कामगारांच्या हक्कांसाठीही संघर्ष

चार श्रमसंहिता व नियम रद्द करावेत, संघटित व असंघटित कामगारांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार, नोंदणी व मान्यता मिळावी, आठ तासांचा कामाचा दिवस, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व सामाजिक सुरक्षा द्यावी, तसेच संप व सामूहिक वाटाघाटीचा अधिकार अबाधित ठेवावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

शेतकरी, कामगार, वनजमीन कसणारे, आशा कर्मचारी आणि प्रबुद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जेलभरो आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन ॲड. कुमार मोहरमपूरी, ॲड. डी. बी. नाईक, चंद्रशेखर सिडाम, अनिता खुनकर, मनीष इसाळकर, देविदास मोहकर, उषा मुरखे, सुरेखा बिरकुरवार, रमेश मिरासे, गजानन ताकसांडे, किसन मोहुर्ले, कवडू चांदेकर, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, पुंडलिक ढुमने आदींनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.