Latest News

Latest News
Loading...

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या उज्वलाला देरकर दाम्पत्यांचा मायेचा आधार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या उज्वला मेश्राम या मुलीच्या शिक्षणाला आधार देत आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी सौ. किरणताई देरकर यांनी माणुसकीचा संवेदनशील परिचय दिला. कार्यक्रमात सहजपणे दिलेला शब्द कृतीत उतरवत किरणताई यांनी उज्वलाच्या शैक्षणिक खर्चासाठी मदतीचा हात पुढे केला.

बाळापूर (बोपापूर) येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला सौ. किरणताई देरकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांना उज्वला मेश्राम या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी उज्वलाला जवळ घेत तिची आस्थेने विचारपूस केली. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलीची परिस्थिती पाहून किरणताई भावूक झाल्या.

यावेळी त्यांनी उज्वलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याच्या भावनेतून “तुझ्या शिक्षणासाठी मी नक्की मदत करेन आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन,” असा शब्द दिला. कार्यक्रम संपल्यानंतरही हा शब्द त्यांनी विसरला नाही. गावातील गौरव पंधरे यांच्याशी संपर्क साधून उज्वलाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उज्वलाला शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उज्वलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत देरकर दाम्पत्याने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

“तुझ्यावर कोणतेही संकट आले तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू मन लावून शिक्षण घे, आयुष्यात मोठी हो, समाजात स्वतःचे नाव कमव आणि एक दिवस मोठी अधिकारी बन,” असा प्रेरणादायी संदेश किरणताई देरकर यांनी उज्वलाला दिला.

एखाद्या कार्यक्रमात दिलेला शब्द केवळ औपचारिक न ठेवता त्याची पूर्तता करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आणि गरजू मुलीच्या शिक्षणाला आधार देणे, या कृतीतून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाली. देरकर दाम्पत्याच्या या मायेच्या आधारामुळे उज्वलाच्या शिक्षणाला नवी उमेद मिळाली असून, त्यांच्या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.