बसस्थानकावर बसची वाट पाहत उभे राहायचे... निर्धारित वेळ निघून गेल्यानंतरही बसचा पत्ता नाही... चौकशी केली तर पुन्हा काही काळ प्रतीक्षा करण्याचे उत्तर मिळते! वणी आगारातील एसटी बससेवेचे सध्याचे चित्र प्रवाशांच्या संतापाचे कारण ठरत आहे. वेळापत्रक निश्चित असतानाही बसेस वेळेवर प्लॅटफॉर्मवर लागत नसल्याने वणी आगाराचा कारभार नेमका कोणाच्या नियोजनावर चालतोय, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून वणी आगारातून विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या वेळांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता जाणवत आहे. अनेक बसेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिराने बसस्थानकावर दाखल होत असल्याने प्रवाशांवर ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना बसच्या विलंबामुळे नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचता येत नसल्याने त्यांची कामे खोळंबली जात आहेत.
वणी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी एसटीने ये-जा करतात. मात्र बसचे वेळापत्रकच अनिश्चित झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजच्या वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. सायंकाळी परतीच्या फेऱ्यांनाही विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना बसस्थानकावर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेषतः दुपारच्या सुमारास नागपूरकडे जाणाऱ्या बसेस तसेच सायंकाळच्या ग्रामीण भागातील फेऱ्यांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणीत भर घालत असल्याच्या तक्रारी आहेत.
एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांची प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे तिच्या वेळापत्रकाला विशेष महत्त्व आहे. मात्र बस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. वारंवारच्या विलंबामुळे काही प्रवासी आता नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.
सध्या एसटीचा प्रवास प्रचंड महागला आहे. तिकीटदरांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. तरीही सुरक्षित प्रवासाची हमी म्हणून एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसमध्ये चढल्याबरोबर प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेतले जातात; मग सेवा देताना वेळेचे भान का ठेवले जात नाही? असा थेट सवालही संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे वणी आगारातील बसफेऱ्यांचे नियोजन, चालक-वाहकांची उपलब्धता, बसच्या फेऱ्यांमधील समन्वय आणि प्रत्यक्ष वेळापत्रक यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त वेळापत्रक लावून उपयोग नाही; त्या वेळेत बस धावणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वणी आगाराच्या कारभाराची तातडीने दखल घ्यावी, विस्कळीत वेळापत्रक सुरळीत करावे आणि “वणी आगारातून बस वेळेवर सुटते” असा विश्वास प्रवाशांमध्ये पुन्हा निर्माण करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

No comments: