वणी शहरातून चोरीला गेलेला तब्बल २५ लाख रुपये किमतीचा बारा चाकी टाटा हायवा ट्रक अखेर वणी पोलिसांनी लातूर येथून जप्त केला. सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यांवरील नोंदी आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. अथक तपासानंतर लातूर येथील पार्किंगमध्ये बनावट क्रमांक लावून उभा केलेला हायवा पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, २ जुलै २०२६ रोजी हर्षल रमेश लोहबळे, रा. वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. ते सुपरवायझर असलेल्या विशाल लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचा टाटा हायवा ट्रक (CG 04 NV 1481) लालपुलिया, वणी येथे उभा करण्यात आला होता. १ जून २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी हा हायवा ट्रक लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्हीपासून मोबाईल लोकेशनपर्यंत तपासाची साखळी
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोलनाका फुटेज तसेच मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण केले. या तांत्रिक तपासातून पोलिसांना महत्वपूर्ण धागेदोरे गवसले आणि या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर आणि नागपूर परिसरात कौशल्यपूर्ण तपास केला.
या तपासादरम्यान अजय चंद्रभान केसकर (३५), रा. मांजरी, जि. चंद्रपूर; राजू उर्फ जयप्रकाश गयाप्रसाद केसकर (४७), रा. राजूर कॉलरी, जि. यवतमाळ; हिरालाल बापुलाल कश्यप (४१), रा. कन्हान, जि. नागपूर; आणि रविशंकर जगदीश प्रसाद (४०), रा. कामठी कॉलनी क्रमांक ४, जि. नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
त्यांची चौकशी आणि केलेल्या तपासातून चोरीचा हायवा लातूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने लातूरच्या दिशेने रवाना झाले.
बनावट नंबर लावून पार्किंगमध्ये लपवला हायवा
लातूर बायपास रोडवरील विविध पार्किंग यार्डची पोलिसांनी कसून पाहणी केली. अखेर गणपती चौक, लातूर येथे सेलिब्रेशन इन्व्हेंटच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये चोरीला गेलेला हायवा आढळून आला. चोरट्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हायवा ट्रकवर बनावट क्रमांक (TS 29 TV 8676) लावला होता.
मात्र पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर ते वाहन चोरीचेच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २५ लाख रुपये किमतीचा हायवा जप्त करत वणी पोलीस ठाण्यात आणला.
या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून, तपासादरम्यान निष्पन्न होणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. वाहन चोरीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभार वणी) रॉबिन बन्सल आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुप्पलवार, गणेश मेश्राम आणि रितेश भोयर यांनी पार पाडली.
वाहन चोरीनंतर चोरट्यांनी ते जिल्ह्याबाहेर नेऊन बनावट क्रमांकाच्या आड लपविण्याचा प्रयत्न केला; मात्र तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या अथक पाठपुराव्यामुळे २५ लाखांचा हायवा पुन्हा पोलिसांच्या हाती लागला.

No comments: