Latest News

Latest News
Loading...

‘आदर्श शिक्षक’ गजानन कासावार यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शिक्षकाची ओळख केवळ वर्गखोलीत शिकविण्यापुरती मर्यादित नसते, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा शिक्षकच खऱ्या अर्थाने आदर्श ठरतो. गजानन कासावार यांनी आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेत अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे काम केले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनुकरणीय असून, ते केवळ पुस्तकी ज्ञान देणारे शिक्षक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणारे खरे मार्गदर्शक आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी काढले.

नगर परिषद शाळा क्रमांक ७ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित स्नेहमिलन व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते.

‘नोकरी नव्हे, व्रत म्हणून शिक्षकी पेशा जगले’

हंसराज अहीर पुढे बोलतांना म्हणाले की, गजानन कासावार यांनी अध्यापनाला केवळ नोकरी न मानता ते एक व्रत म्हणून जगले. विद्यार्थ्यांना प्रेमाने जवळ करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांना जीवनाची योग्य दिशा देणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. ते आज सेवेतून निवृत्त झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मनातून कधीही निवृत्त होणार नाहीत, असेही अहीर यांनी नमूद केले.

आमदार संजय देरकर यांनी कासावार यांच्या साध्या राहणीमानासोबतच उच्च विचारसरणीचा गौरव केला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेले ज्ञान आणि संस्कार आज मोठ्या वटवृक्षाचे रूप धारण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातही ठसा

यवतमाळ अर्बन बँकेचे नितीन खर्चे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कासावार यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबत शासनाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले.

वणी नगरपालिकेच्या अध्यक्ष विद्या आत्राम यांनी कासावार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा विद्या आत्राम यांनी यावेळी उल्लेख केला. मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांनी कासावार यांना प्रयोगशील शिक्षक म्हणून गौरवित त्यांच्या व्यापक जनसंपर्काची आणि विद्यार्थीहितासाठीच्या धडपडीची प्रशंसा केली.

काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी कासावार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या विविध प्रयोगांचा उल्लेख केला. शाळेत व्यायामशाळा सुरू करण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. राज्य शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून केलेला सन्मान आणि विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाचा गौरवही त्यांनी केला.

‘३९ वर्षांच्या सेवेत नवा आदर्श निर्माण केला’

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कासावार यांच्या प्रदीर्घ शिक्षकी कारकिर्दीचा आढावा घेतला. ३९ वर्षांच्या सेवेत त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकविले नाही, तर त्यांच्यात सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण निर्माण करण्याचे काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी विद्यार्थी जागृतीचे कार्य केल्याचे बोदकुरवार यांनी सांगितले.

यावेळी विजय चोरडिया यांनीही कासावार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली सुसंस्कारांची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

वीसहून अधिक संस्थांकडून सत्कार

स्नेहमिलन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील जवळपास २० हून अधिक संस्था तसेच मान्यवरांच्या वतीने गजानन कासावार व त्यांच्या पत्नी प्रज्ञा कासावार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यामुळे सोहळ्याला कृतज्ञता आणि आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. शिक्षिका स्नेहलता चुंबळे यांनी ‘कुंभारासारिखा गुरू नाही रे जगात’ हे प्रसंगगीत सादर केले, तर शिक्षक विजय गंधेवार यांनी स्वरचित गौरवगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. डॉ. दीपक हूड, नरेंद्र मुऱ्हार आणि डॉ. अतिक सय्यद यांच्या गीतांच्या मैफलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

स्वीकृत नगरसेवक रवी बेलुरकर यांनी आभार मानले. आयोजक आशीष पावडे, सुनील येमुलवार, अनिल येमुलवार, पंकज कासावार, प्रफुल्ल कासावार, साक्षी कासावार, आशीष डंभारे, राजू कासावार, कौशिक खेरा आणि डॉ. विवेक गौफणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने या भावपूर्ण स्नेहमिलन सोहळ्याची सांगता झाली.

No comments:

Powered by Blogger.