Latest News

Latest News
Loading...

जिद्दीला सलाम! पोलीस दलात निवड झालेल्या कोमलच्या कुटुंबाला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान


प्रशांत चंदनखेडे वणी :-

स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणाचा सोहळा न राहता गावातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जिद्दीला आणि यशाला सलाम करण्याचा दिवस ठरावा, या भावनेतून कायर ग्रामपंचायतीने यंदा एक आगळावेगळा आदर्श घालून दिला. नुकतीच पोलीस दलात निवड झालेल्या कोमल चौधरी हिच्या कर्तृत्वाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयातील स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान चौधरी कुटुंबाला देण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कोमल चौधरी हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पोलीस दलात स्थान मिळविले. तिच्या या यशामुळे केवळ चौधरी कुटुंबाचाच नव्हे, तर कायर गावाचाही नावलौकिक वाढला आहे. तिच्या कर्तृत्वातून ग्रामीण भागातील मुलींसमोर शिक्षण, मेहनत आणि ध्येयाच्या जोरावर यश संपादन करण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

ही बाब लक्षात घेऊन सरपंच नागेश धनकसार यांनी चौधरी कुटुंबाला स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला. शासकीय कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान एखाद्या कर्तृत्ववान कुटुंबाला देण्याचा हा उपक्रम गावासाठी निश्चितच वेगळा आणि प्रेरणादायी ठरला.

यावेळी सरपंच नागेश धनकसार यांच्या हस्ते चौधरी कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. कोमलच्या यशाचे कौतुक करताना ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाला प्राधान्य देऊन मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला.

‘कर्तृत्वाची दखल आणि जिद्दीचा सन्मान’ या भावनेतून ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला सामाजिक आणि प्रेरणादायी अर्थ देणारा ठरला. ध्वजारोहणाचा मान चौधरी कुटुंबाला देऊन कायर ग्रामपंचायतीने गावातील गुणवंत, कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची नवी परंपरा सुरू केली आहे.

या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोमल चौधरीच्या यशाचा सन्मान करताना कायर ग्रामपंचायतीने गावातील मुलींच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

No comments:

Powered by Blogger.