Latest News

Latest News
Loading...

अतिक्रमणाच्या वादातून शेतकऱ्यावर काठीने हल्ला; डोके फुटून रक्तबंबाळ


प्रशांत चंदनखेडे वणी :-

अतिक्रमणाच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने शिवीगाळ करीत शेतकऱ्यावर काठीने हल्ला केल्याची घटना आमलोन येथे घडली. या हल्ल्यात अशोक नथ्थुजी रांगणकर (५४) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वणी येथे उपचार करण्यात आले.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, रांगणकर यांचा शेजारी राहणाऱ्या शशिकला अशोक भोंगळे व तिचा पती अशोक किसन भोंगळे यांच्यासोबत अतिक्रमणाच्या जागेवरून वाद सुरू आहे. याच कारणावरून दोघांकडून वारंवार शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचे रांगणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रांगणकर घरी आले असता शशिकला भोंगळे यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तिचा पतीही तेथे आला. वाद वाढताच शशिकला हिने काठीने रांगणकर यांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे. डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाल्यानंतरही दोघांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताची बोटे पिरगळून खाली पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आरडाओरड ऐकून गणेश रामदास मिलमिले व रामदास नानाजी बोबडे यांनी धाव घेत रांगणकर यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना मुकूटबन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वणी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

उपचार पूर्ण झाल्यानंतर अशोक रांगणकर यांनी २९ ऑगस्ट रोजी मुकूटबन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंगळे पती पत्नीवर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अतिक्रमणाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाने थेट मारहाणीचे रूप घेतल्याने आमलोन परिसरात या घटनेची चर्चा आहे.

No comments:

Powered by Blogger.