महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील वाहतूक निरीक्षक जयश्री सुरज मसराम यांना कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आल्याने आगारात खळबळ उडाली आहे. त्यांच्या कार्यकाळात बसफेऱ्यांचे नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन आणि आगाराच्या उत्पन्नात झालेली घट या बाबी चौकशीच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
निलंबन आदेशानुसार, वणी आगाराच्या वाहतूक व्यवस्थापनात अपेक्षित नियोजन न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बसफेऱ्यांमध्ये घट होणे, काही फेऱ्या वारंवार रद्द होणे, मार्गात एसटी बसेस नादुरुस्त होणे तसेच चालक-वाहकांच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन न झाल्याने आगाराच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः ऑगस्ट २०२६ मध्ये वणी आगाराच्या उत्पन्नात घट झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते. तसेच १३ ऑगस्टपर्यंत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थस्थळ योजना’ अंतर्गत वणी आगारातून एकही एसटी बस पाठविण्यात आली नसल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. चालक व वाहकांच्या गैरहजेरीमुळे आगाराचे किलोमीटर कमी झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सण २०२५च्या तुलनेत सण २०२६ मध्ये एसटीच्या प्रवासात तब्बल १९ हजार किलोमीटरची घट झाल्याचे आदेशातील माहितीत नमूद असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर उत्पन्न व भारमानातही घट झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम आगाराच्या आर्थिक कामगिरीवर झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, नियोजनाचा अभाव, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात आलेली कथित तफावत आणि वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे प्रशासनाच्या चौकशीतून पुढे आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
निलंबनाच्या कालावधीत जयश्री मसराम यांनी आगारप्रमुखांकडे हजेरी लावायची असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू राहणार आहे. वणी आगाराच्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि उत्पन्नातील घसरणीसाठी नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत, याचा अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, वाहतूक निरीक्षकांच्या निलंबनामुळे वणी आगारातील कर्मचारी व प्रवासी व्यवस्थेवर त्याचा पुढील काळात काय परिणाम होतो, तसेच आगाराचे विस्कटलेले नियोजन पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.

No comments: