Latest News

Latest News
Loading...

अवघ्या तीन महिन्यांत रस्ता उखडला; निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शिंदोला–येनक–साखरा–जुगाद एम.टी.डी.आर.-७९ या मार्गाचे काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटताच रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आदर्श हायस्कूल ते शेवाळा फाटा तसेच कोलगाव परिसरातील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याची तांत्रिक तपासणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आयुष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वणीचे उपविभागीय अभियंता यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता, पांढरकवडा यांना निवेदन सादर केले. निवेदन देण्यासाठी नागरिक कार्यालयात गेले असता उपविभागीय अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकारी कार्यालयात उपस्थित झाल्यावर त्यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.

शिंदोला–येनक–साखरा रस्त्याचे काम बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ यांना देण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही १४ ऑक्टोबर २०२४ रोजी रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.

रस्त्याचे शेड्युल, डिझाईन, पुलिया डिझाईन तसेच करारातील अटी-शर्तींनुसार काम झाले आहे की नाही, याची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी. निकृष्ट बांधकाम आढळल्यास ते काढून गुणवत्तापूर्ण रस्ता करून द्यावा तसेच संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“जनतेच्या पैशातून उभारलेला रस्ता काही महिन्यांतच खराब होत असेल तर कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती केली नाही, तर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकरणी काय भूमिका घेतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी आयुष ठाकरे, अजिंक्य शेंडे, प्रणय बदखल, भगवान मोहिते, रवी वाटेकर, कार्तिक आत्राम, लता ठावरी, दादू गोरे, अनिकेत बलकी, पियुष हजारे, प्रवीण डोहे, सुदर्शन शिंदे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.