जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर लाकडी काठीने हल्ला करून जखमी केल्याची घटना वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात घडली. या प्रकरणी मोहसिन शेख मतिन शेख (वय २३, रा. शास्त्रीनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इस्त्राईल शहा अहमद शहा (वय २३, रा. शास्त्रीनगर, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. आरोपी हा दारू पिण्याच्या सवयीचा असून तो दारू पिल्यानंतर नेहमी वार्डात दादागिरी करतो. दारू पिऊन दादागिरी करणाऱ्या आरोपीला मोहसीन शेख यांनी टोकले असता या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. यावेळी मोहसीन शेख यांनी पोलिसांत तक्रार दिल्याने त्याचा आरोपीच्या मनात राग होता.
दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार दीपक चौपाटी येथील एका पानठेल्यावर उभा असताना आरोपी हा हातात लाकडी काठी घेऊन तेथे आला. ‘तू जास्त हुशार झाला का? माझ्या कामात नेहमी अडथळा आणतोस,’ असे म्हणत त्याने शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या हल्ल्यात तक्रारदाराच्या डाव्या हाताला तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आले. मारहाणीनंतर आरोपीने पुन्हा आपल्या वाटेत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी बीएनएसएसच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या घटनेवरून गुन्हेगारी प्रावृत्ती वाढीस लागल्याचे दिसून येत असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस व कायद्याचा धाक उरला नसल्याने अशा लोकांची परिसरात दहशत निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात दादागिरी करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी वचक निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या मारहाणीमागील नेमका वाद काय होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

No comments: