Latest News

Latest News
Loading...

महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये शिरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; गेटसमोर सुरू झालेला वाद पोहोचला हाणामारीपर्यंत


प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील नायगाव खुर्द येथील महालक्ष्मी रिसॉर्टच्या गेटसमोर दारूच्या नशेत सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीत परिवर्तित झाल्याची घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) रात्री घडली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने रिसॉर्टच्या आवारात घुसून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत प्लास्टिकची खुर्ची त्याच्या डोक्यावर मारली. तसेच लाकडी दांड्यानेही जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत सावर्ला येथील सुमित रविंद्र तुरणकर (३१) हा तरुण जखमी झाला असून, हल्लेखोरांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सुमित तुरणकर हा तरुण महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये अधून मधून इलेक्ट्रिकचे काम करतो. शुक्रवारी रात्री रिसॉर्टच्या चौकीदाराने रिसॉर्टसमोर दोन व्यक्ती दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याची माहिती सुमितचा मित्र विनोद चोपणे याला दिली. त्यानंतर सुमित व विनोद हे दोघेही रिसॉर्टच्या गेटजवळ गेले. त्या दोघांना पाहताच तेथे गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एकाला त्यांनी पकडले व त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने गोलू शेख, रा. वणी असे सांगितले. नंतर पळून जात असलेला दुसरा व्यक्तीही तेथे आला, आणि त्याने आपल्या इतर साथीदारांना फोन करून तेथे बोलावून घेतले.

यानंतर घटनास्थळी आणखी तीन व्यक्ती आले आणि वाद वाढला. त्यांनी सुमित, विनोद व रिसॉर्टच्या चौकीदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी तुम्ही येथेच थांबा आपण ‘सेटलमेंट’ करू असे म्हणत ते पाचही जण तेथून निघून गेले. मात्र काही वेळाने त्या पाच व्यक्तींसोबत आणखी काही व्यक्ती तेथे आले. आणि त्यांनी रिसॉर्टमध्ये प्रचंड राडा घातला. त्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने रिसॉर्टच्या गेटवरून उड्या मारून आवारात प्रवेश केला आणि सुमित व विनोद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

गेटसमोरील वादाचे रूपांतर अचानक हल्ल्यात झाले. यावेळी एका व्यक्तीने प्लास्टिकची खुर्ची उचलून सुमित याच्या डोक्यात मारल्याने त्याला दुखापत झाली. त्यानंतर लाकडी दांड्यानेही त्याच्या शरीरावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ही माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहचताच गावातील काही नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांना पाहताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुमित याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणात सुमित तुरणकर याने गोलू शेख, आयान, जिहान, मोबीन, संकेत, रेहान शेख यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्वच आरोपींवर बीएनएसएसच्या कलम 118(1), 191(3), 296, 3(5), 329(3), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

रिसॉर्टमध्ये नेमका वाद कशावरून झाला, हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि मारहाणीमागील कारण काय, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची चौकशी झाल्यानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.