जुन्या वादातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात घुसून तरुणासह त्याच्या आई-वडील व वहिनीला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना चिंचमंडळ येथे घडली. एवढेच नाही तर त्याने अश्लील शिवीगाळ करत ‘संपूर्ण परिवाराला खतम केल्याशिवाय राहणार नाही’, अशी धमकीही दिली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गजानन हनुमान राऊत (४२, रा. चिंचमंडळ) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विकास हनुमान चाफले (३०, रा. चिंचमंडळ) यांच्या तक्रारी नुसार, गजानन राऊत व चाफले कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात. विकास यांच्या मोठ्या भावाने आरोपीच्या वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून यापूर्वीही त्यांच्यात वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वादातून आरोपीने विकास यांच्या भावाच्या गालावर चापट मारल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अशातच १८ ऑगस्टला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास विकास हे शेतातील काम आटोपून घरी परतत असताना घरासमोरील सिमेंट रोडवर गजानन राऊत हा हातात काठी घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसले. गजानन हा विकास यांना उद्देशून अश्लील शिवीगाळ करत असतांना विकास यांनी त्याला जाब विचारला आणि ते घरात गेले. त्यांच्याच मागे गजानन हा देखील हातात लाकडी काठी घेऊन त्यांच्या घरात शिरला.
आरोपीने विकास यांना काही कळायच्या आत काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. विकास यांना मारहाण होत असतांना त्यांचे आई-वडील व वहिनी मध्यस्थी करण्यास आले असता त्यांनाही आरोपीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीतुन करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर आरोपीने चाफले कुटुंबीयांना गंभीर धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मारेगाव पोलिसांनी आरोपीवर बीएनएसच्या कलम 296, 333, 115(2), 351(2) व 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एएसआय दिगंबर किनाके करीत आहेत.

No comments: