कंपनीत कामावर घेतले जात नसल्याच्या कारणावरून शेजारी महिलेवर संतापलेल्या महिलेने तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुकुटबन येथे घडली. एवढेच नव्हे तर मारहाणीदरम्यान महिलेचे केस धरून तिचे डोके गोट्यावर आपटल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
या प्रकरणी वनमाला सुरेश बोरवार (४२, रा. वार्ड क्र. १, मुकुटबन) यांनी मुकुटबन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीत घराशेजारी राहणाऱ्या महिलेवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वनमाला बोरवार या घरासमोरील अंगणात कपडे धूत असताना त्यांच्या घराशेजारी राहणारी महिला तेथे आली. ‘मला कंपनीत कामावर घेत नाहीत, याबाबत तू साहेबांना माझ्याविषयी काय सांगितले?’ अशी विचारणा त्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावर वनमाला बोरवार यांनी आपण कोणाला काहीही सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र, यानंतर वाद वाढला. शेजारी राहणाऱ्या महिलेने वनमाला यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर केस पकडून कपडे धुण्याच्या गोट्यावर डोके आपटल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. नंतर त्यांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या टाचेवर व खांद्याला मार लागल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
मध्यस्थी करून वाद सोडविला
मारहाणीचा प्रकार सुरू असताना वनमाला यांचे पती सुरेश बोरवार तसेच शेजारी राहणाऱ्या इतर महिला मध्यस्थीसाठी धावून आल्या. त्यानंतर आरोपी महिला ही तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर वनमाला बोरवार यांनी पतीसोबत मुकुटबन पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कंपनीतील रोजगाराच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेवर बीएनएसएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: