श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची वणीकरांना आतुरता लागलेली असतानाच ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ने यंदाच्या महोत्सवाचे रणशिंग फुंकले आहे. आगामी जन्माष्टमी महोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि आकर्षक करण्यासाठी समितीच्या वर्ष २०२६-२७ च्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. कुणाल विजय चोरडिया यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सव दिमाखात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २२ ऑगस्ट रोजी निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करीत त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर नूतन कार्यकारिणी व वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत शुभम मदान व श्याम लाहारिया यांची उपाध्यक्षपदी, राहुल मुंजेकर यांची कार्याध्यक्षपदी, अभय नागतुरे यांची सहकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उमेश पोद्दार यांची सचिवपदी, सुधीर तालसे सहसचिव, जयंत पांडे कोषाध्यक्ष, राजू रिंगोले सहकोषाध्यक्ष आणि अमोल धानोरकर यांच्यावर संयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आशिष सिसोदिया यांची प्रसिद्धी प्रमुख, दीपक पाऊणकर यांची सहप्रसिद्धी प्रमुख, पार्थ त्रिवेदी यांची सोशल मीडिया प्रमुख तर सौरभ राजुरकर यांची प्रिंट मीडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
यंदाचा जन्माष्टमी महोत्सव ‘धमाकेदार’ करण्याची तयारी
कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा जन्माष्टमी महोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्रिदिवसीय महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांच्या नियोजनासाठी विविध उपसमित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.
दरवर्षी वणीकरांचे विशेष आकर्षण ठरणारी भव्य नृत्य स्पर्धा यंदाही ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समिती’च्या वतीने मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जन्माष्टमी महोत्सवात यंदा भक्तीबरोबरच सांस्कृतिक रंगांचीही उधळण पाहायला मिळणार आहे.
समितीच्या कार्याला सातत्य आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ सल्लागार समितीचीही घोषणा करण्यात आली असून, विजय चोरडिया, आशिष गुप्ता, निकेत गुप्ता, विजय पुण्यानी, दिवानजी फेरवानी, मूलचंद जोशी, राजाभाऊ बिलोरिया, महावीर कटारिया, नारायण गोडे, सुरेश मांडवकर, संतोष मार्कंडे, अनिल रेभे, विशाल दूधबडे, गजानन बत्तुलवार, पिंकी बत्रा, प्रा. दिलीप अलोणे आणि मयूर गेडाम या अनुभवी व जेष्ठांच्या मार्गदर्शनामुळे उत्सवाचे नियोजन अधिक प्रभावी व व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फेरनिवडीने जबाबदारी वाढली; उत्सवाच्या भव्यतेची उत्सुकता
अध्यक्षपदाची पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली समितीसमोर यंदाचा उत्सव अधिक व्यापक करण्याचे आव्हान आहे. धार्मिक उत्साहासोबतच वणी शहरातील नागरिकांना आकर्षित करणारे सांस्कृतिक उपक्रम, भव्य रॅली आणि महिलांसाठीची नृत्य स्पर्धा यामुळे यंदाच्या जन्माष्टमी उत्सवाची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल दूधबडे यांनी केले. बैठकीला समितीचे पदाधिकारी, सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: