शेतातून घरी परतत असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून दगडाने तोंडावर मारून जखमी केल्याची घटना शिरपूर येथे घडली. या हल्ल्यात वृद्धाच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. प्राथमिक उपचारानंतर वृद्धाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी दिनकर विश्वनाथ भोयर (६५) यांची पत्नी लता भोयर (५५) यांनी पोलिसांत जबानी रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, दिनकर भोयर हे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चारगाव रोडवरील शेतात गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास गणेश धोबे हा हातात काठी घेऊन त्यांच्या घरी आला. आणि ‘मला काकाने मारले,’ असे सांगून तो तेथून निघून गेल्याने लता भोयर यांना संशय आला.
त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे गणेश कामटकर व राकेश भरतकर यांना दिनकर भोयर यांचा शोध घेण्यासाठी शेताकडे पाठविले. त्या दोघांनी दिनकर यांना उपचारासाठी शिरपूर येथील दवाखान्यात आणले. याची माहिती मिळताच लता भोयर तेथे पोहोचल्या. त्यावेळी दिनकर यांच्या तोंडातून रक्तस्राव सुरू होता.
पत्नीने घटनेबाबत विचारणा केली असता दिनकर भोयर यांनी सांगितले की, ते शेतातून घरी परतत असताना डोर्लीकर यांच्या भट्टीजवळ गणेश सुधाकर धोबे (३२) याने त्यांना पाहून शिवीगाळ केली. त्यांनी ‘शिवीगाळ का करतोस?’ अशी विचारणा केल्यानंतर गणेशने खाली पडलेला दगड उचलून त्यांच्या तोंडावर मारल्याचे सांगितले.
या हल्ल्यात दिनकर भोयर यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून, शिरपूर येथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. याबाबत पत्नी लता भोयर यांच्या जबानी रिपोर्टसह प्राथमिक इज्युरी रिपोर्टच्या आधारे शिरपूर पोलिसांनी गणेश धोबे याच्यावर ११८(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

No comments: