Latest News

Latest News
Loading...

परमडोह ग्रामपंचायतीच्या विकासकामांची आज चौकशी!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील परमडोह (परसोडी) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२१ ते २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध विकासकामांवर अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या कामांचे आरोप झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

१५ वा वित्त आयोग, सामान्य फंड, जल जीवन मिशन तसेच विविध विकास निधीतून झालेल्या कामांची आज, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता चौकशी समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित कामांचा दर्जा, प्रत्यक्ष झालेली कामे, त्यावर झालेला खर्च तसेच उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेषतः कोणत्या योजनेतून किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्षात किती खर्च करण्यात आला आणि त्या निधीतून कामे कितपत दर्जेदार झाली, याची चौकशी समितीकडून तपासणी केली जाणार असल्याने या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

चौकशीसाठी पंचायत समिती राळेगाव व जिल्हा परिषद यवतमाळ येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली आहे. के. पी. पवार हे चौकशी प्रमुख असून एकता नागदेवते, आनंद पी. मुळे आणि डी. बी. मस्के हे समितीचे सदस्य आहेत.

दरम्यान, चौकशीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन व विद्यमान सरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवश्यक सर्व दप्तर व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सहा वर्षांच्या विकासकामांचा लेखाजोखा आता चौकशी समितीसमोर उघड होणार आहे.

आरोपांमध्ये तथ्य आहे की विकासकामांमध्ये खरोखरच अनियमितता झाली आहे, याचा उलगडा चौकशी अहवालानंतरच होणार असला तरी आज होणारी प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची छाननी परमडोह ग्रामपंचायतीच्या कामकाजावर महत्त्वाचा प्रकाश टाकणार आहे.

No comments:

Powered by Blogger.