प्रशांत चंदनखेडे वणी :-
महागडा आयफोन (16 प्रो) खरेदी करण्याच्या लालसेतून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने चक्क आपल्या आजोबांच्याच घरातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना वणी शहरात उघडकीस आली. घरातील चावीने कपाटाचे लॉकर उघडून नातवाने तब्बल ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ६ लाख ७२ हजार रुपये) लंपास केले. विशेष म्हणजे चोरीचा माल घेऊन शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच वणी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासह एका तरुणाला ताब्यात घेत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
कनकवाडी येथील बंडू विठोबा बोढाले (६२) यांच्या घरी २० ते २१ ऑगस्टदरम्यान ही चोरी झाली होती. कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने गायब झाल्याने १ सप्टेंबर रोजी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना डीबी पथकाला मिळालेल्या विश्वासार्ह माहितीने तपासाला निर्णायक वळण मिळाले.
आयफोन घेण्यासाठी पैसे हवे होते म्हणून कुटुंबातीलच विधिसंघर्षग्रस्त बालकाने आपल्या मित्राच्या सांगण्यावरून चोरीचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने आयफोन खरेदी करण्याची इच्छा आपल्या मित्रांकडे व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्याला चोरीसाठी प्रोत्साहित केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बालकाने आजोबांच्या घरातील कपाटाची चावी वापरून लॉकर उघडला आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चोरी केलेला ऐवज विक्री करण्याच्या उद्देशाने विधिसंघर्षग्रस्त बालक आणि गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव हे चंद्रपूर किंवा नागपूरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संविधान चौक परिसरात कारवाई करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून सोन्याचा हार, मोठा गोफ, लहान गोफ आणि कानातील टॉप्स असे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळाल्याने तपास पथकाला मोठे यश आले आहे.
दरम्यान, या चोरी प्रकरणातील अन्य एक आरोपी सुरज हुसैन गेडाम (२५) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केलेल्या या कारवाईत पोउपनि. सैय्यद साजीद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे व रितेश भोयर यांनी सहभाग घेतला.
मोबाईलच्या वाढत्या आकर्षणासाठी कुटुंबातीलच विश्वासाचा गैरफायदा घेत सोन्यावर डल्ला मारण्यापर्यंत मजल गेल्याने या घटनेने वणीत खळबळ उडाली आहे. आयफोन घेण्याच्या हट्टातून सुरू झालेली चोरी अखेर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे उघडकीस आली.

No comments: