तालुक्यातील पाथरी (गोवारी) ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभाराविरोधात ग्रामस्थांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. सन २०२१ ते २०२५ या कालावधीत तत्कालीन सरपंचाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, तसेच रोजगार सेवकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व निधीच्या गैरवापराचे आरोप तक्रार अर्जातून करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तक्रारीतील आरोपांनुसार, कामे पूर्ण होण्यापूर्वीच बिले काढण्यात आली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष काम न करताच निधीचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकास निधीचा नेमका वापर कुठे आणि कशासाठी झाला, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शालेय शौचालयाचे काम अपूर्ण; तरीही पूर्ण बिल?
गावातील शालेय शौचालयाच्या बांधकामासाठी मंजूर निधीतही अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ९७ हजार ७१३ रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप असून, शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिल काढण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घरकुलांच्या मस्टरवरही प्रश्नचिन्ह
घरकुल योजनेतही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या घरांच्या मनरेगा मस्टरवर रोजगार सेवकाच्या पतीच्या नावाने मजुरी काढून रक्कम कुटुंबाकडे वळविल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील सासू, दीर आणि पती यांच्या नावावर घरकुल मंजूर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मनरेगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पांदण रस्त्याच्या कामातील निधीही रोजगार सेवकाच्या पतीच्या नावाने काढल्याचा आरोप आहे. गावात शोषणखड्डे न करता त्यांची बिले काढण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घंटागाडी न चालवताच हजारोंचे बिल?
गावातील स्वच्छतेसाठी घंटागाडीची सुविधा प्रत्यक्षात न चालवता बोगस बिले काढून हजारो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागील सहा महिन्यांपासून घंटागाडी गावात आलीच नाही. तरीही इंधन व पगाराच्या नावाने बोगस बिले काढण्यात आली. लॉगबुक व जीपीएस तपासून त्याची खात्री करून घेता येईल, असेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप
रोजगार सेवक पूर्वी उपसरपंच होत्या आणि सध्या प्रशासक समितीच्या सदस्य असल्याचे नमूद करत, पदाचा गैरवापर करून रोजगार सेवक म्हणून मानधन घेत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच स्वतःच्या कामांना त्या स्वतःच मंजुरी देत आहेत. यासोबतच तक्रारी केल्यानंतरही कारवाई होणार नाही, अशा स्वरूपाची अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली कामे पारदर्शक असून ग्रामपंचायतीच्या निधीत कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. मनरेगांच्या कामाचे कंत्राट मिळाल्यानंतर त्या कामांची बिले रोजगार सेवकाच्या माध्यमातून काढली जातात. तेही कामे पूर्ण झाल्याची शहानिशा करूनच. तसेच घंटागाडी न चालविता बिले काढल्याचाही आरोप बिनबुडाचा असून बोगस बिले काढल्याची तक्रार चुकीची आहे. एकूणच ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये व विकासनिधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप निरर्थक आहे.माजी सरपंच रविंद्र बदखल
दरम्यान, तत्कालीन सरपंचाच्या कार्यकाळात त्यांच्या स्वाक्षरीने विविध बिले काढण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे सन २०२१ ते २०२५ या कालावधीतील संपूर्ण विकासकामे, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, बिले, मस्टर आणि कामांची सद्यस्थिती यांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत. तक्रार अर्जावर प्रफुल बोर्डे यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामस्थांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असले तरी त्यातील सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र विकासाच्या नावाने आलेल्या निधीचा प्रत्यक्षात किती आणि कसा वापर झाला, याची चौकशी झाल्यास पाथरी ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या तक्रारीवर कोणती भूमिका घेते आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments: