Latest News

Latest News
Loading...

विद्यार्थ्यांसाठी वेळेवर एसटीच्या फेऱ्या सुरू करा; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शाळा सुटल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या तातडीने सोडवून कोरपना-वणी, मुकुटबन-कोसारा, मुकुटबन-अडेगाव, मुकुटबन-खातेरा-वेडद या मार्गांवर वेळापत्रकानुसार एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, शाळा सुटल्यानंतर योग्य वेळी बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नियोजित वेळेनुसार एसटी बसेस बसस्थानकावर लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून अवेळी बसेस सोडल्या जात असल्याने त्यांना घरी पोहचायला बराच उशीर होत आहे. त्यानुषंगाने निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यानुसार, कोरपना-वणी मार्गावर ४० विद्यार्थी प्रवास करत असून कोरपनावरून वणीसाठी सायंकाळी ५.३० वाजता बस सोडावी, मुकुटबन-कोसारा मार्गावर २० विद्यार्थी प्रवास करत असून मुकुटबनवरून कोसारासाठी दुपारी ४.३० वाजता बस सोडावी, मुकुटबन-अडेगाव मार्गावर १०० विद्यार्थी प्रवास करत असून मुकुटबनवरून सायंकाळी ५ वाजता बस सोडावी आणि मुकुटबन-खातेरा-वेडद मार्गावर ८० विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्यासाठी मुकुटबनवरून सायंकाळी ५.३० वाजता बस सोडावी. या मागण्यांनुसार बसफेऱ्या सुरू झाल्यास शाळा-कॉलेजमधून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून वरील वेळापत्रकानुसार बसफेऱ्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आशिष खुलसंगे, तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, तालुका संघटक नरेंद्र बदखल, विभाग प्रमुख मिननाथ काकडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Powered by Blogger.