राजूरमध्ये गुन्हेगारीचा वाढता विळखा; पोलीस चौकीला कुलूप, बिट अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) गावातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गावातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा धाक निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणाऱ्या सक्षम बिट अधिकाऱ्याची आवश्यकता असताना, राजूर बिटकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राजूर येथे पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही चौकी अनेकदा कुलूपबंद अवस्थेत दिसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. बिटला नियुक्त असलेले जमादार व पोलीस कर्मचारी चौकीत नियमित उपस्थित राहत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस चौकी असूनही प्रत्यक्षात तिचा नागरिकांना कितपत फायदा होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजूरमधील अलीकडच्या घटनांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. ७ सप्टेंबर रोजी चार ते सहा तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून टाके पडल्याचे सांगण्यात येते. सीटी स्कॅनमध्येही डोक्याला गंभीर मार असल्याचे निदान झाल्याची माहिती आहे. मात्र या घटनेची पोलिसांकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रार नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वी नालीत खरकटे टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. एका महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने ती रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली. या घटनेचे पडसाद अद्यापही गावात उमटत असल्याची चर्चा आहे.
राजूरमध्ये मारामारी, टोळक्यांकडून हल्ले आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचीही चर्चा आहे. जुगार, मटका, अवैध दारूविक्री तसेच कोळसा चोरीसारख्या प्रकारांबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या आरोपांची अधिकृत सत्यता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
गावात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रकार वाढत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे केवळ एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि नियमित पोलिसिंग करण्याची मागणी जोर धरत आहे.
‘उंटावरून शेळ्या हाकणे’ कधी थांबणार?
संवेदनशील बिटवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, नियमित गस्त आणि संशयित गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना, केवळ कागदोपत्री व्यवस्था ठेवून उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “बिट अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष गावात किती वेळ देतात?” हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.
राजूरसारख्या संवेदनशील गावात रुबाबदार, कार्यतत्पर आणि निष्पक्षपणे कायद्याची अंमलबजावणी करणारा बिट अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे. तसेच राजूर पोलीस चौकीत पोलिसांची नियमित ड्युटी लावावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
राजूरमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होणार की गुन्हेगारांचाच दबदबा कायम राहणार? या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईतून मिळणार आहे.


No comments: