प्रशांत चंदनखेडे वणी :-
कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जीर्ण व धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी सातत्याने केलेली मागणी, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनीही हा प्रश्न उचलून धरत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास मीना यांनी कवडशी शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी २३.५० लाख रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देत निधी मंजूर केला आहे.
कवडशीच्या जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील दोन वर्गखोल्या अतिशय जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. डिसेंबर २०२५ पासून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून या धोकादायक खोल्या पाडून नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे सातत्याने करण्यात येत होती.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी शाळा सुरू असताना वरांड्याची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे शाळेच्या इमारतीची धोकादायक अवस्था पुन्हा एकदा समोर आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयात वर्ग भरविण्याची व्यवस्था करण्यात आली.
घटनेनंतर ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत प्रस्ताव मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
कवडशी हे खाणबाधित क्षेत्रात येत असल्याने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत ‘शिक्षण’ या उच्च प्राधान्याच्या बाबीतून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्यानुसार दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २३.५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आदेशानुसार या प्रस्तावासाठी २० टक्के म्हणजे ४.७० लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कवडशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शाळा मिळावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे आवाज उठविला. त्याला माजी जि.प. सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची जोड मिळाली. अखेर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रस्तावाला मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिल्याने या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.
आता मंजूर निधीतून बांधकामाची प्रक्रिया तातडीने सुरू करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
धोकादायक भिंतींच्या सावटाखाली सुरू असलेल्या शिक्षणाला आता सुरक्षित छत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कवडशीच्या ग्रामस्थांच्या सामूहिक लढ्याचे हे यश मानले जात आहे.
No comments: