पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने उभी पिकं संकटात सापडली असताना आणि बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतानाच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी, ११ सप्टेंबर रोजी वरुणराजाने वणी शहरावर जोरदार बरसात केली. दुपारी दोनच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच शहराला अक्षरशः पावसाने झोडपून काढले.
तान्ह्या पोळ्यानिमित्त शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुकानदार, ग्राहक आणि रस्त्यावरील वाहनचालकांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला. मात्र, नागरिकांसाठी अचानक आलेला हा पाऊस गैरसोयीचा ठरला असला तरी शेतपिकांना मात्र तो नवसंजीवनी देणारा ठरला आहे.
पावसाने मोठी उसंत घेतल्याने शेतातील उभी पिके संकटात सापडली होती. पावसाअभावी पिके वाळण्याची भीती निर्माण झाली होती. खरीप हंगाम हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अशातच शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळ्याच्या काळातही बळीराजाच्या मनात उत्साहापेक्षा पिकांची काळजी अधिक होती.
काल मोठा पोळा उत्साहात साजरा करताना शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला सजविले आणि निसर्गाने साथ द्यावी, अशी प्रार्थना केली. बैलांच्या अंगावर सजावटीचा साज चढविताना शेतकऱ्यांच्या नजरा मात्र आकाशाकडे लागल्या होत्या. बळीराजाची ही आर्त हाक वरुणराजाने ऐकली आणि तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पावसाची जोरदार बरसात केली.
दुपारच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळा संपत आल्याची चिंता आणि आता पाऊस पडणार की नाही, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आजच्या पावसाने काहीसा दिलासा दिला. पिकांना आवश्यक असलेला पाऊस मिळाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाची पालवी फुटली आहे.
तान्ह्या पोळ्याच्या उत्साहात बालगोपाळांच्या आनंदावर काही काळ पावसाचे विरजण पडले असले, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा पाऊस आनंदाची बरसात ठरला. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून पावसाळा संपल्याची चाहूल लागलेली असताना आजच्या धुवांधार पावसाने ‘अजून पाऊस बाकी आहे’ असा दिलासादायक संदेशच जणू दिला.
तान्ह्या पोळ्याच्या दिवशी झालेल्या या बरसातीने शहरातील नागरिकांची धावपळ उडवली, पण शेतात मात्र पिकांनी आणि बळीराजाच्या आशेने पुन्हा मान वर केली!

No comments: