Latest News

Latest News
Loading...

शुल्लक कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ओळखीतीलच दोन युवक वृद्ध व्यक्तीची टिंगल करून त्याला विनाकारण त्रास देत असतांना त्यांना हटकल्याने निर्माण झालेल्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आल्याची घटना बैल पोळ्याच्या दिवशी (१० सप्टेंबर) शास्त्री नगर परिसरात घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

शुल्लक कारणावरून जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती निर्ढावली असून त्यांना पोलीस व कायद्याचा जराही धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. युवकांमध्ये भाईगिरी प्रचंड वाढली असून शहरासह ग्रामीण भागातही भाईगिरीला उधाण आले आहे. किरकोळ वादातून मारहाण व शस्त्राने हल्ले चढविण्याच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यातच गुन्हेगारी कारवायांमुळे नेहमी चर्चेत राहणारा दीपक चौपाटी परिसर परत एका घटनेने हादरला आहे. एका वृद्ध व्यक्तीला विनाकारण त्रास देणाऱ्या युवकांना हटकणाऱ्या तरुणावरच धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष पुंडलिक कोरवते हे दीपक चौपाटी परिसरातील सलिम चिकन सेंटरजवळ उभे असतांना त्यांच्या परिचयातील आसिफ शेख व राहुल मत्ते हे एका वृद्ध इसमाची मस्करी करून त्याला विनाकारण त्रास देतांना आढळले. त्यावर त्यांनी त्या दोघांना वृद्धाला कशाला त्रास देता, असे म्हटले असता त्यांनी संतोष कोरवते यांच्याशीच वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर संतोष कोरवते यांनी नमते घेत ते तेथून निघून गेले. मात्र मनात राग धरून असलेल्या त्या दोघांनी आपल्या अन्य दोन साथीदारांसह संतोष कोरवते हे रात्री ११.१५ वाजता मोटारसायकलने घराकडे जात असतांना त्यांना रस्त्यात गाठले. आणि 'तो वृद्ध तुझा कोण लागतो' असे म्हणत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. 

त्यांच्या पोटावर व कमरेवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यांनी हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना मोटारसायकलवरून ओढून खाली पाडले, व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर संतोषचा भाऊ घटनास्थळी पोहचला आणि त्याने संतोषला तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने संतोष कोरवते यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. 

संतोष कोरवते यांच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये आसिफ शेख, राहुल मत्ते यांच्यासह जिगर शेख व अच्छु शब्बीर शाह हे देखील सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दोघांनीही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव पुंडलिक कोरवते यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १६ सप्टेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.