Latest News

Latest News
Loading...

वणी भाजपकडून ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’चे आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच गणेशोत्सव अधिक सुंदर, पर्यावरणपूरक व सामाजिक भान जपणारा व्हावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने *‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’*चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार असून, विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे ‘अ’ व ‘ब’ असे दोन गट करण्यात आले आहेत. ‘अ’ गटात घरगुती गणपती, तर ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन यापैकी कोणत्याही एका विषयावर आधारित आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे.

दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १६ सप्टेंबर २०२६पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांनी आपल्या देखाव्याचा फोटो व्हॉट्सॲपद्वारे आयोजकांकडे पाठवायचा आहे. त्यानंतर १७ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष घरगुती गणपती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करतील.

स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरतीच मर्यादित राहणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव अशा दोन्ही गटांमधून निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण करण्यात येणार आहे. नोंदणी करताना घराचा किंवा गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता तसेच मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲपद्वारे देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि भाजप वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी केले आहे.

या स्पर्धेचे संयोजक मनोज सरमुकदम असून सहसंयोजक गणेश आसूटकर, बालाजी भेदोडकर, उमेश गंधारे, डॉ. नीलिमा दवणे, वैशाली वातिले, आरती गणेश वांढरे, संगीता मेश्राम, प्रिती बिडकर आणि पूजा रामगिरवार आहेत.

इच्छुक गणेशभक्त, नागरिक व गणेशोत्सव मंडळांनी आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.