Latest News

Latest News
Loading...

बनावट विक्रीपत्राच्या आधारे फेरफार? वडगाव जमीन प्रकरणाला नवे वळण




प्रशांत चंदनखेडे वणी :-

वडगाव (धं.) येथील जमीन व्यवहाराशी संबंधित कथित बनावट विक्रीपत्र, फेरफार आणि सातबारा नोंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार सुरज चाटे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे केली आहे.

सुरज चाटे यांच्या तक्रारीनुसार, बनावट विक्रीपत्राच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आला असून त्याचा परिणाम सातबारा उताऱ्यावरही झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित विक्रीपत्र खरे व वैध आहे का, फेरफार करताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे खरी आहेत का आणि संपूर्ण प्रक्रियेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती, याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महसूल अभिलेखातील फेरफार हा थेट जमीन मालकी व हक्काशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे चाटे यांनी म्हटले आहे. कथित गैरप्रकारात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग किंवा दुर्लक्ष आढळल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीने ११ सप्टेंबर रोजी वणी तालुक्याचा दौरा केला. विविध शासकीय विभागांचे कामकाज, विकासकामे आणि योजनांचा आढावा घेणाऱ्या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडेच वडगाव (धं.) येथील कथित महसूल गैरप्रकाराचा मुद्दा मांडण्यात आल्याने या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता, दोष सिद्ध झाल्यास कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करावी, अशी ठाम मागणी चाटे यांनी केली आहे.

दरम्यान, विक्रीपत्राची सत्यता, फेरफाराची प्रक्रिया, सातबारा नोंदींची कायदेशीरता आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत अधिकृत चौकशी झाल्यानंतरच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाते का आणि पुढील कारवाई कोणत्या दिशेने होते, याकडे वणी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.