Latest News

Latest News
Loading...

पोळ्याच्या उत्साहाला गालबोट; बैल बुजडल्याने तरुणावर काठीने हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

पोळा सणाला गावातील मंदिरात बैलजोडी दर्शनासाठी घेऊन गेल्यानंतर बैल बुजडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. तरुणाने बैल हाकण्याच्या काठीने मारहाण केल्याने कपाळ व हातावर दुखापत झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आल्याने पोलिसांनी नयन उर्फ मेघराज लक्ष्मण टोंगे (वय २४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रशांत अनंता खोबरे (वय २५, रा. खडकी गणेशपूर, ता. झरी) यांच्या तक्रारीनुसार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता खडकी येथील नवीन वस्तीमध्ये पोळा भरला होता. पोळा फुटल्यानंतर ग्रामस्थ बैलजोड्या घेऊन जुन्या वस्तीतील माऊली मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रशांत खोबरे हे देखील त्यांचा भाऊ दुर्गेश याच्यासह बैलजोडी घेऊन मंदिरात गेले होते.

त्याचवेळी नयन उर्फ मेघराज टोंगे हाही बैल घेऊन तेथे आला होता. त्याचे बैल बुजडल्याने त्याने प्रशांत खोबरे यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रशांत खोबरे हे वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना नयन याने हातातील बैल हाकण्याच्या काठीने प्रशांत यांना मारहाण केली, असा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताला दुखापत झाली.

यानंतरही आरोपीने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. हा प्रकार सुरू असताना गावातील अथर्व राजू लोंडे, शुभम दशरथ गोवारदिपे यांच्यासह काही नागरिकांनी धाव घेत दोघांची सोडवणूक केली. त्यानंतर प्रशांत खोबरे हे आपल्या भावासह बैलजोडी घेऊन तेथून निघून गेले.

पोळ्यासारख्या पारंपरिक सणाच्या दिवशी किरकोळ कारणावरून वाद वाढून थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे. सण-उत्सवाच्या काळात संयम राखण्याची गरज असतानाच अशा प्रकारच्या घटनांमुळे उत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. 

प्रशांत खोबरे यांनी पोलिस ठाण्यात येऊन दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी नयन उर्फ मेघराज टोंगे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.