शहरातील निगुर्डा नदीच्या काठावरील पाणी फिल्टर पंपाजवळ विनापरवाना धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार आणि बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ता पेंडकर यांच्या नेतृत्वाखालील पथक १२ सप्टेंबर रोजी वणी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी आंबेडकर चौक परिसरात पथकाला गुप्त माहिती मिळाली की, निगुर्डा नदीच्या काठावरील पाणी फिल्टर पंपाजवळ एक इसम मोटारसायकलवर प्लास्टिकच्या गोणीमध्ये विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून फिरत आहे.
माहितीची खात्री करून पंचांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयित इसम मोटारसायकलसह आढळून आला. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता मोटारसायकलला बांधलेल्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये धारदार लोखंडी तलवार आढळून आली.
पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारीची एकूण लांबी ७२ सेंटीमीटर असून धारदार पात्याची लांबी ६० सेंटीमीटर आणि मुठीची लांबी १२ सेंटीमीटर आहे. तिची अंदाजे किंमत एक हजार रुपये आहे. तसेच बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच ३४ एडी ३१८७) किंमत अंदाजे ५० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव जगन्नाथ उर्फ जगन जर्नाधन मोहीजे (वय २२, रा. मालवीवार्ड, रेल्वे स्टेशनसमोर, वरोरा, जि. चंद्रपूर) असे आहे. त्याला तलवार बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.
दरम्यान, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४, १३५ अन्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
एलसीबीचे सपोनि दत्ता पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधीर पांडे, नापोकों किशोर आडे, पोशी सलमान शेख, पोशी रजनिकांत मडावी व चापोहवा सतीश फुके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments: