प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहर परिसरात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन महिला बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गणेशपुर येथील २२ वर्षीय तरुणी १४ सप्टेंबरच्या पहाटेपासून बेपत्ता झाली, तर सेवानगरातील २७ वर्षीय विवाहित महिला १६ सप्टेंबरच्या दुपारपासून घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांत कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच परिसरात शोध घेऊनही महिला आढळून न आल्याने वणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
फायनान्स कंपनीत काम करणारी तरुणी बेपत्ता
गणेशपुरातील मंगलमपार्क येथील फ्लॅटमध्ये राहणारी २२ वर्षीय तरुणी मागील दीड वर्षापासून वणी येथील एका फायनान्स कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होती. १३ सप्टेंबरच्या रात्री कुटुंबातील सर्वजण झोपले असतांना ती अचानक घरून बेपत्ता झाली. पहाटे ४ वाजता मुलीची आई नमाजसाठी उठली असता तिला मुलगी घरात दिसून आली नाही.
कुटुंबीयांनी परिसर, शेजारी, नातेवाईक तसेच मित्रमैत्रिणींकडे तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. तिचा मोबाईलही घरी न आढळल्याने कुटुंबीयांनी तिच्या दोन्ही मोबाईल क्रमांकांवर फोन लावण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही नंबर बंद येत होते. शेवटी मुलीच्या आईने १५ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सेवानगरातील विवाहिताही अचानक बेपत्ता
दुसरी घटना सेवानगर परिसरात घडली. येथील विवाहित महिला १६ सप्टेंबरच्या दुपारपासून बेपत्ता झाली आहे. महिलेचे पती हे दुपारी ३ वाजता बाजारात गेले होते. त्यावेळी महिला व तिचे सासू-सासरे घरीच होते. सायंकाळी ५ वाजता पती घरी परतले असता त्यांना पत्नी घरात दिसली नाही.
त्यामुळे त्यांनी पत्नीबाबत आईला विचारणा केली असता ती शेजारी बसायला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र शेजारीही ती आढळली नाही. पतीने तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही बंद येत होता. त्यानंतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे महिलेच्या पतीने १७ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे आव्हान
दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने महिलांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, महिलांना नेमके कोणी व कोणत्या कारणाने नेले, याबाबत तक्रारीत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेपत्ता महिलांचा शोध घेणे आणि त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण स्पष्ट करणे, हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
वणी पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांत बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, त्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतरच या घटनांमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

No comments: