घरात जेवण करून आराम करत असलेल्या महिलेच्या घरासमोर अचानक आलेल्या इसमाने तिच्यावर हल्ला केल्याची घटना मुर्धोनी येथे घडली. संशयिताने महिलेचे केस ओढून थापड-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडानेही प्रहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिलेच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. याबाबत महिलेने १८ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या जबानीनुसार, १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सुप्रिया वय ३३ वर्षे (नाव बदलेले) या आपल्या घरी जेवण करून आराम करत होत्या. त्यावेळी एक इसम अचानक त्यांच्या घरासमोर आला. त्याला पाहून घाबरल्याने त्या घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागल्या.
याचवेळी संबंधित इसमाने त्यांचे केस ओढून थापड-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील दगडानेही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाला दुखापत होऊन सूज आली.
महिलेची आरडाओरड ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडविल्यानंतर संबंधित इसम तेथून निघून गेल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव गणेश झिले (अंदाजे ३५), रा. पळसोनी, ता. वणी असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितल्यानंतर महिलेने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
.jpeg)
No comments: