Latest News

Latest News
Loading...

बापरे... गावात एकाच रात्री तीन चोऱ्या; सरपंच बाईच्या घरातही धाडसी चोरी

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरालगत असलेल्या वागदरा या गावात एकाच रात्री तीन घरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी शहरासह ग्रामीण भागातही धुमाकूळ घातल्याने नागरिक प्रचंड धास्तीत आले आहेत. चोरट्यांनी वागदरा येथील दोन बंद घरे फोडली तर एका घरात कुटुंबातील सहा जण झोपलेले असतांनाही चोरीचा डाव साधला. विशेष म्हणजे नुकताच कार्यकाळ संपलेल्या सरपंचाच्या घरीच चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सरपंचाच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. चेहऱ्यावर कपडा बांधलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

शहरापासून जवळच असलेल्या वागदरा या गावात चोरट्यांनी १८ सप्टेंबरला एकाच रात्री तीन घरांना टार्गेट करून घरातील ऐवज चोरून नेल्याच्या घटनेने गावकरी प्रचंड धास्तीत आले आहेत. गावच्या माजी सरपंच शीतल जयपाल गौरकार यांच्या घरीच चोरट्यांनी धाडसी चोरी करीत सोन्याचे दागिने लंपास केले. कुटुंबातील सहा सदस्य घरातच झोपले असतांना चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घरात शिरलेल्या चोरट्यांची जराही चाहूल न लागावी, एवढी गाढ झोप कशी काय लागली, हे कुटुंबियांनाही कळेनासे झाले आहे. त्यांचा पाळीव कुत्राही भुंकला नसल्याने त्यांना वेगळाच संशय येत आहे. घरातील सर्वच सदस्यांना गुंगी चढल्यागत झोप आल्याने वेगळाच संशय बळावत असल्याचे बोलले जात आहे. कुटुंबियांना जाग आल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले व कपाटाचे दार उघडे दिसल्याने घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्याचबरोबर स्वप्नील पोथले यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ऐवज चोरून नेला. स्वप्नील हे मुलगा रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याच्या भेटीकरिता चंद्रपूरला गेले होते. तर त्यांची पत्नी बाजूच्या घरी झोपायला गेली होती. बंद घरी चोरट्यांनी चोरीचा डाव साधत घरातील ऐवजावर हात साफ केला. सकाळी स्वप्नील यांची पत्नी घरी आली असता तिला घरात चोरी झाल्याचे आढळून आले. 

तिसऱ्या घटनेतही बंद घरालाच टार्गेट करण्यात आले. गावातील महिला काही दिवसांपासून बाहेरगावी गेली होती. त्यामुळे तिच्या घराला कुलूप लागले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी करीत घरातील मुद्देमाल लंपास केला. नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी महिलेच्या घरी मोठी चोरी झाल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे. 

दरम्यान, याच गावातील मिलन मेश्राम यांच्या घरीही चोरट्यांनी चोरीचा डाव साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पत्नीच्या सर्तकतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. चोरट्यांनी आधी मिलन मेश्राम यांच्या घरातील हॉलच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी त्यांच्या किचनमधून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटाचा दरवाजा उघडताच त्यांच्या पत्नीला जाग आली. तेंव्हा त्यांच्या समोर चोरटा उभा होता. काही क्षण मिलन यांची पत्नी धास्तावलेल्या नजरेने चोरट्याकडे पाहत होती. नंतर त्यांनी जोरात ओरडून पतीला उठवले. पती खडबडून उठताच चोरट्याने पळ काढला. सुदैवाने पत्नी पत्नीसोबत कुठलीही अनुचित घटना घडली नाही. आणि पत्नीच्या सतर्कतेमुळे चोरीचीही घटना टळली. 

एकाच रात्री चोरट्यांनी तीन घरी चोरीचा डाव साधल्याने गावकरी काळजीत आले आहेत. मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेल्या या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. 

पोलिसांना गावात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात येऊन पंचनामा केला. याप्रकरणी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, हे अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.