प्रेमसंबंध जुळले, सोबत राहिली; पण प्रियकराने दिला दगा! लग्न न करता सोबत राहणाऱ्या महिलेवर कोयत्याने हल्ला
प्रेमसंबंध जुळल्यानंतर प्रियकरासोबत राहायला गेलेल्या महिलेला प्रियकराने दगा देत थेट लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुकुटबन येथे उघडकीस आली. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.
मुकुटबन पोलिसांत २० सप्टेंबर रोजी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार, संबंधित ३५ वर्षीय महिला रोजमजुरी करून उदरनिर्वाह करते. पतीच्या निधनानंतर तिची अडेगाव येथील भगवान लक्ष्मण मासीरकर (५०) याच्याशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर ती त्याच्यासोबत अडेगाव येथे राहायला गेली.
मात्र, काही काळानंतर प्रियकर किरकोळ कारणांवरून महिलेशी वाद घालू लागला. तिला मारहाण करू लागला. प्रियकराच्या सतत वाद घालण्याला व मारहाणीला कंटाळून महिला मुकुटबन येथे आपल्या घरी परत आली. मात्र, प्रियकराने तिचा पिच्छा सोडला नाही. तो तेथेही येऊन तिला त्रास देऊ लागला.
दरम्यान, २० सप्टेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास महिला शेतातून घरी परतल्यानंतर आराम करत असतांना भगवान मासीरकर तेथे आला. तेंव्हा महिलेने त्याला तू जावयाकडे पैसे का मागितले, अशी विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादातून भगवान याने महिलेला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने लोखंडी कोयत्याने महिलेवर हल्ला चढविला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
हल्ल्यानंतर भगवानने ‘तुला मारून टाकतो’ अशी धमकीही दिल्याने महिला प्रचंड घाबरली. त्यामुळे तिने थेट मुकुटबन पोलिस ठाण्यात धाव घेत प्रियकराविरोधात तक्रार नोंदविली. महिलेच्या जबानी रिपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी भगवान मासिरकर याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याला वादाचे गालबोट लागले आणि त्याचे रूप कथित हल्ल्यात झाले. महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

No comments: